प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत.  यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची ते पायाभरणी करतील तसंच अनेक प्रकल्पांचं लोकार्पण देखील करणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधल्या आरोग्य आणि  पायाभूत सुविधा अधिक बळकट  करण्यासाठी विविध  महत्त्वाच्या प्रकल्पांची ते पायाभरणी करतील.

याअंतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, जोधपूर इथलं साडेतीनशे खाटांचं  ट्रॉमा सेंटर, क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक आणि प्रधानमंत्री - आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत राजस्थानमध्ये विकसित केले जाणारे सात क्रिटिकल केअर ब्लॉक या प्रकल्पांचा समावेश आहे. जोधपूर विमानतळावर अत्याधुनिक अशा नव्या टर्मिनल इमारतीच्या विकासासाठी ते पायाभरणी करतील.

अत्याधुनिक संशोधनाला आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन  देण्यासाठी सुमारे एक हजार १३५ कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक आयआयटी अर्थात ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था - जोधपूर परिसर’ उभारण्यात आला असून त्याचं  देखील यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे. तसंच  राजस्थानमध्ये सुरु होणाऱ्या दोन नवीन रेल्वे सेवांना प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये जैसलमेर ते दिल्ली जोडणारी नवीन ‘रुनिचा एक्स्प्रेस’ आणि मारवाड जंक्शन - खांबळी घाट यांना जोडणाऱ्या ‘नवीन हेरिटेज रेल्वेगाडीचा’ समावेश आहे.