भ्रष्टाचार, घराणेशाही, सांप्रदायिक संतुष्टीकरण या विरोधात भाजपा उद्यापासून देशभर अभियान चालवणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीतल्या संसद भवन परिसरात पार पडली. भ्रष्टाचार, घराणेशाही, वोट बँकेचं राजकारण या विरोधात उद्यापासून देशभर अभियान चालवलं जाणार आहे. त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलं, अशी माहिती संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी बातमीदारांना दिली. या महिन्याच्या 14 तारखेला विभाजन विभिषिका दिवस, तसंच हर घर तिरंगा अभियान संपूर्ण देशभर साजरा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांनी संसदेत मांडलेल्या अविश्वास ठरावाच्या औचित्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा ठराव आपण सहजपणे जिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त केला. या बैठकीला भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा. केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आदी नेते उपस्थित होते.