येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होईल - मंत्री रविंद्र चव्हाण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई गोवा महामार्गावरच्या पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांतल्या ८४ किलोमीटर रस्त्यावरच्या एकेरी मार्गिकेवरून आगामी गणेशोत्सवाच्या आधी, १० सप्टे़ंबरपासून पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू होईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गावरच्या पनवेल ते वाकण फाटा नागोठाणे पर्यंतच्या कामाची पाहणी केली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री वापरली जात आहे. येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत या महामार्गावरच्या दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होईल असं त्यांनी सांगीतलं. 

कासूपासून पुढच्या कामाची गती वाढवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना तसे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. महामार्गाच्या कामादरम्यान वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागांचं सहकार्य घ्यावं अशा सूचना दिल्या असून, याबाबत पोलीस अधिक्षकांसोबत चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं.