हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षा आणि बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाबाबत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि केनिया यांचं एकमत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी महासागर क्षेत्रात, सागरी सुरक्षेतलं  तसंच बंडखोर विरोधी संयुक्त प्रशिक्षणाच्या बाबतीत सहकार्य वाढवण्यावर भारत आणि केनिया यांचं एकमत झालं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केनियाचे संरक्षण मंत्री एडन बेरे ड्युएल यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. त्यावेळी याबाबत चर्चा झाली. ड्युएल तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आले आहेत. 

भारताने आफ्रिकी देशांबरोबरच्या आपल्या प्रतिबद्धतेला प्राधान्य दिल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली होणाऱ्या आगामी जी 20 नेत्यांच्या परिषदेत, जी 20 सदस्यत्वा अंतर्गत आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व जी 20 सदस्य देशांना पत्र लिहिल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आणि केनिया दरम्यानच्या सौहार्दपूर्ण संबंधांची प्रशंसा करताना, केनियाचे कॅबिनेट संरक्षण सचिव एडन बरे ड्युएल म्हणाले की, हे संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये केनियाच्या नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर कॅबिनेट सचिव ड्युअल यांची भारतामधली ही पहिलीच भेट आणि उच्चस्तरीय राजकीय भेट आहे.