कांदा निर्यातशुल्‍क वाढीच्या मुद्द्यावरुन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतमालाच्‍या किंमती वाढल्‍या की सरकार लगेच बंधनं घालतं, कांद्याचे दर वाढून शेतकऱ्याला चांगले पैसे मिळू लागल्यावर केंद्र सरकारनं लगेच निर्यात शुल्‍क वाढीचा निर्णय घेतला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यातल्या दहिवडी इथं केली. ते एका शेतकरी मेळाव्यात बोलत होते. आत्ताच्‍या सरकारच्‍या निर्णयामुळं  कांदा व्‍यापारावर मर्यादा आल्‍या असून गेल्‍या पंधरा दिवसांत कर्जबाजारीपणाला कंटाळून  यवतमाळमध्‍ये २१ शेतकऱ्यांनी आत्‍महत्‍या केली, मात्र त्‍याकडे सरकारचे लक्ष नाही, असं पवार यावेळी म्हणाले.

जो कष्‍टकरी तसंच शेतकऱ्यांच्या  हिताच्‍या आड येईल त्‍याला आमचा पाठींबा असणार नाही असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. मी कृषीमंत्री होतो, त्‍यावेळीही कांद्याच्‍या दराचा प्रश्‍‍न निर्माण झाला होता, पण त्‍यावेळी मी निर्यात कर लावला नाही, बंदी घातली नाही ही आठवणही  पवारांनी करून दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस ची  तयारी आहे.  त्‍यासाठी सगळ्यांनी एकत्र या, असं आवाहन त्यांनी उपस्‍थितांना केलं. प्रश्‍‍न अनेक आहेत. मणिपूरमध्‍ये संघर्ष उफाळुन आलाय. त्याचं लोण इतर राज्‍यातही पसरू लागलं आहे. महिला असुरक्षित आहेत. पण या प्रश्नांकडे  केंद्र सरकारचं लक्ष नसल्याची टीका पवार यांनी  केली.