पुण्यातल्या चांदणी चौक उड्डाण पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे हे देशाच्या विकासाचं केंद्र असून पुणे विभागासाठी पावणे दोन लाख कोटी रुपयांची  कामं सुरू आहेत. पुणे शहराला जल,वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी सरकारने योग्य भूमिका घ्यावी , स्काय बस हे देशाचं भविष्य असून पुण्यात त्याचा वापर व्हायला हवा असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.  पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास आणि एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्प उभे करताना नवीन तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असून त्यामुळे खर्चात मोठी बचत होऊ शकेल. अल्ट्रा हाय परफॉर्मन्स टेक्नॉलॉजी वापरून देशात अनेक ठिकाणी काम केल्यामुळे प्रकल्पाचा खर्च निम्म्याहून कमी आला आहे. आता राज्य सरकारने ही त्यांच्या प्रकल्पामध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा फायदा घ्यायला हवा असं गडकरी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुणे शहरासाठी स्वतंत्र विमानतळ व्हायला हवं यासाठी प्रयत्न सुरू असून शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याकडे राज्य सरकार लक्ष देत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.