मुझफ्फरनगमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उत्तर प्रदेश सरकारला मुझफ्फरनगमध्ये  झालेल्या विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी नोटीस बजावली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातल्या खुब्बापूर गावातल्या एका खाजगी शाळेतल्या शिक्षकानं एका विद्यार्थ्याच्या श्रद्धेचा निरर्थकपणे उल्लेख करून त्याच्या वर्गमित्रांना त्याला मारहाण करण्यास सांगितले होते.  प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलेल्या या व्हिडिओची दखल आयोगानं घेतली आहे. तर या विद्यार्थ्यानं गुणाकाराच्या उदाहरणांमध्ये चूक केल्यामुळं मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला असून शिक्षक आणि शाळेवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. त्याबरोबरच प्रसारमाध्यमांद्वारे दाखवण्यात आलेला मजकूर सत्य असल्यास पीडितेच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालं आहे, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. तसंच मुख्य सचिव आणि उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना चार आठवड्यात या प्रकऱणाचा तपशीलवार अहवाल देण्यासही सांगण्यात आलं आहे.