लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक  संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी केली आहे. येत्या ३१  ऑक्टोबरपर्यंत काही ठराविक प्रतिबंधित आयतींसाठी परवान्याशिवाय आयात करता येऊ शकेल, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

टॅब्लेट आणि लॅपटॉपसारख्या हार्डवेअरच्या आयातीवर कोणतीही बंदी नाही, वैध परवाना असेल तर कंपन्या किंवा व्यापाऱ्यांना अशाप्रकाच्या उपकरणांची आयात करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.  संबंधितांना ऑनलाईन पद्धतीनं परवाना मिळावा या उद्देशानं महासंचालनालयानं एक पोर्टल देखील तयार केलं आहे.

आय टी हार्डवेअर उत्पादनांकरता केंद्र सरकारने कामगिरीशी निगडित प्रोत्सहन योजना सुरु  केली आहे. या योजनेमुळे सुमारे तीन लाख २९ हजार कोटी रुपयांच्या आयटी हार्डवेअरचे एकूण उत्पादन आणि येत्या पाच ते सहा वर्षांत ७५ हजार अतिरिक्त रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.