‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे नवउद्योजकांना आवाहन
• महेश आनंदा लोंढे
पुणे : 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' च्या माध्यमातून आयोजित नवउद्योजक स्पर्धेत राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत व संस्थांनी १५ ऑगस्टपर्यंत पर्यंत अर्ज सादर करून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून करण्यात आले आहे.
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी कार्यरत असून या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करुन त्यातून यशस्वी नवउद्योजक घडविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' चे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये उमेदवार वैयक्तिक अथवा कमाल ३ जणांच्या समूहामध्ये सहभागी होऊ शकणार असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे. उपक्रम हा शैक्षणिक संस्था, जिल्हा तसेच राज्य स्तरावर संपन्न होणार असून याद्वारे विजेत्या उमेदवारांना बीज भांडवल उपलब्ध होणार असून विशेष इनक्युबेशन प्रोग्रामचा लाभ घेता येणार आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी तसेच शैक्षणिक संस्थांनी https://schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहीत मुदतीत स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज मध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्र.सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.