चांद्रयान-3 ने टिपलेली चंद्राची पहिली प्रतिमा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं केली प्रकाशित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चांद्रयान-3 ने टिपलेली चंद्राची पहिली प्रतिमा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं काल प्रकाशित केली. चांद्रयान-3 नं शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा टिपल्या आहेत.प्रक्षेपण झाल्यापासून चंद्रापर्यंतचं सुमारे दोन तृतीयांश अंतर पार केलं असून  चांद्रयान-3 नं शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला, असं इस्रोनं सांगितलं.

भारताचं चांद्रयान-तीन चंद्राच्या आणखी जवळच्या कक्षेत पोचलं आहे. चांद्रयान शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोचल्यानंतर त्याची परिभ्रमण कक्षा चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा टप्पा काल यशस्वी झाल्याचं भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं म्हणजे इस्रोनं म्हटलं आहे. अशा प्रकारे परिभ्रमण कक्षा कमी करण्याचे आणखी तीन टप्पे १७ ऑगस्टपर्यंत होणार आहेत.

पुढचा टप्पा ९ ऑगस्टला होईल. त्यानंतर लँडर आणि रोव्हरचा समावेश असलेले भाग प्रॉपल्शन भागापासून विलग होणार आहेत. लँडर २३ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवेश करेल. परिभ्रमण कक्षा कमी करण्याच्या टप्प्यांमुळे लँडर चंद्रावर अधिक सुविहित पद्धतीनं प्रवेश करेल, असं इस्रोचं म्हणणं आहे.