आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन दूरदृष्य प्रणाली द्वारे केल्यावर आज ते बोलत होते. या प्रारूपात देशातला प्रत्येक प्रदेश, प्रत्येक समाजगट आणि आरोग्य, शिक्षण आणि दळणवळण अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार केला जातो असं ते म्हणाले. ७१० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नव्या विमानतळामुळे अंदमानमधे व्यवसायानुकूल वातावरण निर्मितीसाठी, आणि संपर्क वाढवण्याला चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
या नव्या विमानतळाची क्षमता दर दिवशी अकरा हजार उतारूंची आहे. गेल्या ९ वर्षात अंदमान निकोबार बेटांसाठी ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून अनेक पायाभूत सुविधांचा विकास आपल्या सरकारने केला असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होते. येत्या तीन चार वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या दोनशेच्या पुढं जाईल असं ते म्हणाले. विमानतळावर उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण शिंदे यांच्या हस्ते झालं. ४० हजार ८०० चौरस मीटर जागेत या विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबारमधील दळणवळणाला तसंच पर्यटनाला चालना देण्यात हा विमानतळ मोठी भूमिका बजावणार आहे. दर वर्षाला सुमारे ५० लाख प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे. या इमारतीची रचना समुद्रातील -शिंपल्यांसारखी करण्यात आली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.