भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खुलासा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजकारणात सगळ्याबाबतीत चर्चा होत असतात, मात्र आपण भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवार यांनी आजपासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करणार केली. या दौऱ्यात आज पहिल्या दिवशी नाशिकमध्ये येवला इथं पोहचले. आज संध्याकाळी तिथं त्यांची जाहीर सभा होणार आहे, त्याआधी त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला.

विरोधकांना कमकुवत करायचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपण थकलेलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही असं ते म्हणाले. अनेक नेत्यांचं वय ७० पेक्षा अधिक आहे, आणि तरीही ते कार्यरत आहेत असं त्यांनी आपल्या वयासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षानं बरंच काही दिलं, मात्र बंडखोरांबद्दल आपला अंदाज चुकला अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पवार यांनी या दौऱ्याला सुरुवात केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे, भिवंडी, पडघा, शहापूर, इगतपुरी आणि इतर ठिकाणी पवार यांचं स्वागत केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.