भारतानं जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्था गटापासून जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज प्लास्टिक उद्योग वाढीसाठीच्या दुसऱ्या तंत्रज्ञान विषयक परिषदेला दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेचा हा प्रवास मोठा नाट्यमय असून जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं ती मार्गक्रमण करत आहे, असं ते यावेळी म्हणाले. देशात पहिल्यांदाच कमी महागाईचं दशक राहिलं असून, गेल्या नऊ वर्षांमध्ये महागाईचा सरासरी दर जवळजवळ साडेचार टक्के इतका राहिल्याचं त्यांनी सांगितलं.

प्लास्टिक उद्योगाबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा उद्योग आशा, अभिमान आणि आत्मनिर्भरतेची प्रचिती देतो. देशातल्या प्लास्टिक क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून, या उद्योगात विकासाची अफाट क्षमता असल्याचं  ते म्हणाले. प्लास्टिक उद्योगाच्या वाढीसाठी, अखिल भारतीय प्लास्टिक उत्पादक संघटनेनं मुंबईमध्ये ही परिषद आयोजित केली आहे. प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या आयातीला पर्याय निर्माण करणं आणि केंद्रसरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देणं, हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे.