हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे - मंत्री किरेन रिजिजू

 

नवी दिल्ली : हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे, असं केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला भेट दिल्यानंतर ते आज बोलत होते.

IITM कडे सध्या चार पेटाफ्लॉप क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर असल्याची माहिती देताना ते म्हणाले की, हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी लवकरच IITMला दहा पेटाफ्लॉप क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर प्रदान केला जाईल. हवामानातले बदल आणि त्याचे वेगवेगळे परिणाम लक्षात घेता नागरिकांनी हवामानाचा अंदाज समजून घेण्यासाठी नियमितपणे IMD वेबसाइटला भेट द्यावी, असं रिजीजू यांनी सांगितलं. तत्पूर्वी त्यांनी IITM च्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय ख्यातीची उष्णकटिबंधीय हवामानशास्त्राची प्रमुख संस्था म्हणून त्यांनी IITM चं कौतुक केलं.