पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे गुरुवारी वितरण

 

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत चौदाव्या हप्त्याचा एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीचा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे, अशी माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये यांना २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. २७ जुलै रोजी राज्यातील ८५ लाख ६६ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारणत: १ हजार ८६६ कोटी ४० लाख रुपये इतका लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. राज्यातील ८८ लाख ९२ हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न लाभ अदायगीसाठी नोंदणीकृत झाले आहेत. उर्वरीत सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याकरीता संबंधित बँकेत अर्ज सादर करून आधार संलग्न करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन कृषी आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

चौदाव्या हप्त्याची हस्तांतरित करावयाची रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून राज्यात या योजनेंतर्गत २५ जुलै २०२३ अखेर २३ हजार ७३१ कोटी ८१ लाख रुपये रक्कमेचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.

या समारंभास केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत. या समारंभामध्ये कृषी विज्ञान केंद्रावर https://pmindiawebcast.nic.in या लिंकचा वापर करून परिसरातील शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image