भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं सर्बानंद सोनोवाल यांचं मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं मत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केलं. १७ आणि १८ ऑक्टोबरला होणाऱ्या ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट २०२३ च्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुंतवणूक, सहकार्य, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि देशातल्या सागरी क्षेत्रातल्या संधींना ही शिखर परिषद प्रोत्साहन देईल, असं सोनोवाल म्हणाले. गेल्या ९ वर्षांत सरकारनं केलेल्या प्रमुख कामगिरीविषयी त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय जलमार्गांवर २०१४ मधे ६८ लाख ३० हजार मेट्रिक टन होत असलेली मालाची वाहतूक २०२३ मधे १२ कोटी ६१ लाख ५० हजार मेट्रिक टन इतकी वाढल्याची माहिती सोनोवाल यांनी दिली. राष्ट्रीय जलमार्गासाठी २०१४मधे १८२ कोटी रूपयांची गुंतवणूक झाली ती यंदा ५४४ कोटी रूपये झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. देशातल्या प्रमुख बंदरांचा आता दोन आकडी विकास होत असून कंटेनर बंदरात राहण्याचा कालावधी आणि प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी इतर अनेक प्रगत अर्थव्यव्यवस्थांपेक्षा कमी झाल्याचं ते म्हणाले.