ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात विविध वस्तुंवरचा कर वाढवण्यात आला आहे.

ऑनलाईन खेळ, घोड्याची शर्यत, कॅसिनो यावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य, एलडी स्लॅग, कच्चे किंवा तळलेले, वाळवलेले चिप्स तसंच तत्सम पदार्थ, आणि सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. जरी धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. कर्करोगाशी लढणारी औषधं, दुर्मीळ आजारांवरील औषधं, यासह खासगी कंपन्यांच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कराशी निगडीत तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सात अपिलीय न्यायाधीकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.