’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

 

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७ तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५, लाख ७७ अशा एकूण ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देहु-आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी २७ ते २९ जून २०२३ या कालावधीत वाखरी, गोपाळपुर व ३ रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या. मंदिर परिसरामध्ये, वाळंवट ठिकाणी ३ व ६५ एकर येथे १ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १० बेड क्षमतेच्या अतिदक्षता विभागासह सेवा पुरविण्यात आल्या. पंढरपूर शहरामध्ये १७ ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

देहु-आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर एकूण ६ लाख ६४ हजार ६०७ वारकऱ्यांना मोफत तपासणी व उपचार करुन आरोग्य सेवा पुरविण्यात आली. प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर २३३ तात्पुरत्या 'आपला दवाखाना' मार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. पालखी मार्गावर २४x७ अशा एकूण १९४ आणि अत्यावश्यक रुग्ण सेवेसाठी १०८ च्या ७५ रुग्णवाहिकांमार्फत १९ हजार ८५३ वारकऱ्यांना सेवा देण्यात आल्या. त्यापैकी ८४७ अत्यावश्यक वारकऱ्यांना योग्य वेळी उपचार व संदर्भ सेवा देऊन प्राण वाचविण्यात आले.

पुणे परिमंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन पालखी बरोबर एकूण ९ आरोग्य पथके अविरत पालखी परतेपर्यन्त कार्यरत आहेत. १२४ आरोग्यदुतांमार्फत बाईक ॲम्बुलन्सने पालखी मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्यात आली. ३ हजार ५०० औषधी किटचे दिंडी प्रमुखांना मोफत वाटप करण्यात आले. पालखी मार्गावरील ७ हजार ४६० हॉटेल्स मधील १० हजार ४५० कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी करण्यात आली.

पालखी मार्गावर 156 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच पालखी व मुक्कामाच्या ठिकाणी धुर फवारणी, पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थंमार्फत जैव कचरा विल्हेवाट करण्यात आली. यामुळे पालखी मार्गावर जलजन्य व किटकजन्य उद्रेक झाला नाही.

पंढरपुर येथील ३ महाआरोग्य शिबीरामध्ये २७ ते ३० जून दरम्यान ५ लाख ७७ लोकांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. महाआरोग्य शिबिरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ३ हजार ७१८ तज्ज्ञ डॉक्टर्स व ५०० खासगी वैद्यकीय व्यावसायिक तसेच स्वयंसेवी संस्थांचे १५०० स्वयंसेवक अशा एकूण ५ हजार ७१८ मनुष्यबळामार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात आली.

नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कॅन्सर यासारख्या रोगाबाबत तपासणी करून उपचार करण्यात आले. शस्त्रक्रिया आणि विशेषोपचार सेवेची आवश्यकता असणाऱ्या वारकऱ्यांची यादी करण्यात आली असून सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

-महाशिबिरातून रुग्णांच्या मोफत ४० प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या पूर्ण केलेल्या असून, रुग्णांचा प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल रुग्णांच्या मोबाईलवर देण्यात आलेला आहे. रुग्णांना अतिविशेषतज्ञ मार्फत ऑन्कोलॉजी, न्युरो सर्जरी, गॅस्टोईट्रॉलॉजी यासारख्या वैद्यकीय सेवा मोफत पुरविण्यात आलेल्या आहेत. मोफत नेत्र तपासणी करून ७७ हजार ८५४ चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची यादी करुन मोफत शासकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी ५ बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत होते, त्यामध्ये १५४ रुग्णांना सेवा पुरवण्यात आली व वारकऱ्यांचे प्राण वाचविले. अत्याधुनिक रेडिओ डायग्नॉस्टीक सुविधा, यामध्ये सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. उपचार व आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

मंदिर परिसरामध्ये आरोग्य दूतांमार्फत गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली होती. महाआरोग्य शिबिराकरीता ईएमएस १०८ च्या १५ रुग्णवाहिका व आषाढी वारीसाठी १५ रुग्णवाहिका मंदिर परिसरामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळासह सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती घेतली व रुग्णांशी, डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची त्यांनी प्रशंसा केली व उत्कृष्ट नियोजनाबद्दल आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे कौतुक केले. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सरकार आरोग्यासाठी विविध योजना राबवित आहे याचा सामान्य माणसाला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.