'लोकशाही वारी' या उपक्रमाचे जेजुरी येथे आयोजन

 

पुणे : राज्य निवडणूक आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'लोकशाही वारी' या उपक्रमाचे जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालय येथे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले.

यावेळी दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार पुरंदर विक्रम राजपूत, निवडणूक तहसीलदार शीतल मुळ, नायब तहसीलदार श्री. घाडगे आदी उपस्थितीत होते.

श्री. देशपांडे म्हणाले, 'लोकशाही वारी' उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. लोकशाही सुदृढ करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. मतदानाच्या वेळी तरुणांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावावा. 'लोकशाही वारी' या उपक्रमातून किर्तन, पथनाट्य व भारुड आदी पारंपरिक लोककलेल्या माध्यमातून दहा विद्यापीठातील सुमारे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी मतदार जनजागृती करीत आहेत. यामध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावाची दुरुस्ती करणे, मतदान करणे विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही श्री. देशपांडे म्हणाले.