पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामांपासून शेती आणि शेतकऱ्यांना जपलं पाहिजे असं केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केलं आहे. त्या आज नवी मुंबईतल्या वाशी इथं एपीपीपीसी अर्थात आशिया- प्रशांत वनस्पती संरक्षण आयोगानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होत्या. आंबा फळावर होणारा फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसंच त्यावर संशोधन होण्यासाठी आयोजित केलेल्या या पाच दिवसीय कार्यशाळेत २५ देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाइन पध्दतीनं सहभागी झाले आहेत. 

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यामुळे केवळ किड नियंत्रणच नव्हे खतांचा कमी वापर करण्यावरही सरकारचा भर आहे. पायाभूत सुविधा, निर्यातकेंद्री शेती व्हावी यासाठी काय करता येईल, शेतकऱ्यांच्या विकासाकरता काय करता येईल, याबाबत सहभागी २५ देशांनी विचार करावा, असं आवाहन करंदलाजे यांनी केलं. 

देशात आंब्याच्या १ हजार २०० जाती आहेत. त्यापैकी ३० ते ३५ जातींना व्यावसायिक मान्यता आहे. त्यापैकी १२ जातींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. भारत चारशे कोटी रुपयांचा आंबा निर्यात करतो, तर सुमारे ८०० कोटी रुपयांच्या आंबा पल्पची विक्री केली जाते. आंब्याची १ हजार कोटी रुपयांची उत्पादनं तयार केली जातात. त्यामुळे फळ माशीबाबत संशोधन होणं आवश्यक असल्याचं अपेडाचे संचालक तरूण बजाज यांनी सांगितलं.