'शासन आपल्या दारी' उपक्रमा अंतर्गत ३१७ नागरिकांना लाभ

 

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे तहसील कार्यालयातर्फे पर्वती विधानसभा मतदारसंघातील दत्तवाडी येथे 'शासन आपल्या दारी ' उपक्रमाअंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते विविध योजना आणि सेवांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. मेळाव्यात ३१७ नागरिकांना विविध योजना व सेवांचा लाभ देण्यात आला.

तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के यांच्या उपस्थितीत मेळाव्यात सर्व प्रकारचे शासकीय दाखले व योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नोंदणी, दाखले तयार करून वाटप करणे, योजनांची माहिती देणे यासोबतच योजनांचा प्रत्यक्षात लाभही नागरिकांना देण्यात आला. विविध प्रकारचे ऑनलाईन अर्ज भराण्याची सुविधादेखील करण्यात आली होती.

विविध शासकीय विभागांच्या कक्षाद्वारे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी आणि आधार कार्ड अद्ययावत करण्याची सुविधादेखील यावेळी उपलब्ध करून देण्यात आली होती.

शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी हा चांगला उपक्रम सुरू केला असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्रीमती मिसाळ यांनी यावेळी केले.