शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी - अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. समाज विघातक प्रवृत्तींना वेळेवर रोखणं राज्याच्या हिताचं असेल, असं ते यावेळी म्हणाले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजात दुही निर्माण करण्याचा  प्रयत्न झाला, तरी  देशातली जनता आता सावध असून कोणत्याही भूल-थापांना बळी पडणार नाही, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरचे अत्याचार, वाढती महागाई आणि बेरोजगारी याच मुद्यांवर भर दिला जाणार असून, विकासाच्या मुद्यावरुन राज्याची जनता मागे हटणार नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळानं  आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली.