महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी एक स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राला या क्षेत्रात देशात पहिल्या स्थानावर नेण्यास कटिबद्ध असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. राणे यांनी काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत एमएसएमई विभागाची बैठक घेतली.

या बैठकीत एमएसएमईचे उद्योग राज्यात कशा पद्धतीने राबवता येतील यावर विचारमंथन झालं. मुंबईतील साकीनाका इथल्या एमएसएमईच्या कार्यालयाच्या जागेवरील आरक्षण तत्काळ काढून टाकण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं राणे यांनी सांगितलं. कोविड काळात बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलं होतं. त्यातील 3 कोटी 76 लाखांचं कर्ज उद्योजकांनी वापरलं आणि आता तिथे पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन घेतलं जात असल्याचं राणे म्हणाले.