सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे - परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात SCO, अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. दहशतवादाचा धोका कायम आहे आणि दहशतवाद उखडून काढणं हे SCO च्या मूळ उद्दिष्टांपैकी एक आहे. दहशतवादाच्या विरोधात उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे, दहशतवादी कारवायांसाठी होणाऱ्या वित्तपुरवठ्याचे स्रोत शोधून ते बंद केले पाहिजेत, असं ते म्हणाले. 

इंग्रजी भाषक सदस्य देशांशी सखोल संबंध जोडण्यासाठी इंग्रजीला SCO ची तिसरी अधिकृत भाषा बनवण्याच्या भारताच्या दीर्घकालीन मागणीसाठी सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन डॉ. जयशंकर यांनी केलं. SCO सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आज, जुलैमध्ये होणा-या शिखर परिषदेत विचारासाठी ठेवल्या जाणाऱ्या 15 प्रस्तावांना अंतिम रूप देण्याची शक्यता आहे. सदस्य देशांमधे व्यापार, तंत्रज्ञान, वाणिज्य, सुरक्षा आणि सामाजिक-सांस्कृतिक संबंध या क्षेत्रांमधलं सहकार्य वाढवणं, हे या प्रस्तावांचं उद्दिष्ट असेल. एससीओ बैठकीदरम्यान डॉ. जयशंकर यांनी चीन, रशिया आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. डॉ जयशंकर यांनी एससीओचे सरचिटणीस झांग मिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेतली आणि भारताच्या एससीओ अध्यक्षपदासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केलं.