देशातल्या २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळाव्याचं आयोजन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आज देशभरातल्या २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम, अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळावा आयोजित केला आहे. राज्यात अहमदनगर, अमरावती, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा आणि वाशीम या बारा जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम मेळावा आयोजित केला आहे.
स्थानिक युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध क्षेत्रांमधल्या कंपन्यांना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवारांशी एकाच व्यासपीठावर संपर्क साधू शकतील, आणि त्यांच्या पात्रतेनुसार त्यांची निवड करतील. यामुळे स्थानिक युवकांसाठी उपजीविकेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील, असं यात म्हटलं आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करता येईल, आणि आपल्या जवळच्या पीएम-नाम मेळाव्यात सहभागी होता येईल. इयत्ता ५ वी ते १२ वी उत्तीर्ण, कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक, आयटीआय प्रमाणपत्र धारक, पदविका अथवा पदवीधर यापैकी कोणताही एक पात्रतेचा निकष पूर्ण करणारे उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळाव्यासाठी अर्ज करू शकतील, असं यात म्हटलं आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशभरात अप्रेन्टिसशिप मेळावे आयोजित केले जातात. या मेळाव्यांमध्ये निवडक उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाते, आणि आपल्या प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांना सरकारी निकषांनुसार नवीन कौशल्य संपादन करण्यासाठी मासिक विद्यावेतन दिलं जातं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.