भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या अध्यक्षतेखालील जी-२० राष्ट्रगटाच्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु झाली. रेल्वे तसंच कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं.  भारत शून्य उत्सर्जनाचं लक्ष्य २०७० पर्यंत गाठेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक कॉप २६ परिषदेत सांगितल्याचा उल्लेख दानवे यांनी यावेळी केला. नागरिकांच्या सहकार्यानं भारताला हे लक्ष्य सहज गाठता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शून्य उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारची धोरणं, खाजगी क्षेत्राचा निधी आणि कार्यक्षम उपकरणं वापरणारा जागरूक ग्राहक यांची भूमिका महत्वाची असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनीही बैठकीत मार्गदर्शन केलं. या बैठकीत मंत्रीस्तरीय विषयपत्रिकेवर सहमती निर्माण करण्यासाठी चर्चा सुरू आहे. भारतानं सादर केलेल्या या अजेंड्याला इतर सदस्य देशांनी प्राथमिक पातळीवर सहमती दर्शवल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. ऊर्जा संक्रमणाच्या मार्गातले तांत्रिक अडथळे दूर करणं, ऊर्जा संक्रमणासाठी कमी खर्चात अर्थसहाय्य पुरवणं, ऊर्जा सुरक्षा आणि विविध स्रोतांमधून ऊर्जानिर्मिती, ऊर्जा संवर्धन, भविष्यासाठीचं इंधन आणि जगातल्या सर्व देशांना ऊर्जा उपलब्ध व्हावी या मुद्द्यांवर भारतानं भर दिला आहे.