दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नसल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नाही असं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलं. ते शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या बैठकीत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जागतिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी  शांघाय सहयोग संघटनेच्या सदस्य देशांनी बहुपक्षीय सहयोगावर चर्चा केली.

संघटनेच्या विदेश मंत्र्यांची गोवा इथं झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयशंकर यांनी सांगितलं होतं की, भारतात होणाऱ्या शिखर संमेलनाच्या तयारी बाबत इथं चर्चा झाली असून शांघाई सहयोग संघटनेच्या आपल्या अध्यक्षते दरम्यान सदस्य देशांची सुरक्षा कायम ठेवण्यास आपण प्राथमिकता देत आहोत. संघटनेत सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधण्याचा  प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले.

दहशतवादाला चिथावणी दिल्यामुळे, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या दहशतवादविरोधी विचारांकडे बैठकीत दुर्लक्ष करण्यात आलं तसंच दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानची विश्वासार्हता ही त्यांच्या परकीय गंगाजळीपेक्षा वेगाने कमी होत असल्याचंही ते म्हणाले. या बैठकीत इराण आणि बेलारूसला संघटनेचं पूर्ण सदस्यत्व देण्याबाबतचा आढावा घेण्यात आला, असल्याचं ही जयशंकर यांनी सांगितलं.