शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एससीओ,अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिबंध आणि निर्मूलन या विषयावर चर्चा झाली. एससीईओ सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपल्या प्रदेशात उद्भवलेली मोठ्या प्रमाणातली आपत्कालीन परिस्थिती आणि ती हाताळण्यासाठी केलेल्या उपाययोजना याबद्दल माहिती दिली. 

आपत्कालीन परिस्थितीचा, एससीओ नं निर्धारित केलेल्या चौकटीमध्ये  प्रतिबंध आणि निर्मूलन करण्यासाठी, नवोन्मेषी पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर आणि या क्षेत्रात परस्पर सहकार्याची संभावना, या मुद्द्यांवर एससीओ देशांच्या प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. या चर्चेमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी आणि प्रतिसाद या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर, आणि एससीओ च्या चौकटीत नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे होणाऱ्या विपरीत परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर सदस्य देशांची सहमती झाली. 

२०२३ ते २५ दरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत परस्पर सहकार्य आणि सहाय्य करण्याबाबत एससीओ सदस्य देशांमधल्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठीचा कृती आराखडा या बैठकीत मंजूर झाला.