मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये येणाऱ्या सर्वांना मास्क लावणं सक्तीचं

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचं करण्यात येणार आहे.  विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज तातडीची बैठक घेतली. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून आयुक्तांनी विविध सूचना केल्या आहेत.  देशातल्या विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोकं  वर काढलं असून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची  शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तसंच  प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे.