‘मन की बात’ म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ - उपराष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दर महिन्याला प्रसारित होणारा ‘मन की  बात’ हा कार्यक्रम म्हणजे ‘सकारात्मकतेचा प्रकाश स्तंभ’ असून प्रत्येक भारतीयांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. प्रसारभारतीनं आज नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या 'मन-की-बात@100' या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते  बोलत होते. हा कार्यक्रम म्हणजे देशाच्या विविधतेचं प्रतीक असून आकाशवाणी वरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम पूर्णतः गैर-राजकीय कार्यक्रम आहे, असं ते यावेळी म्हणाले. येत्या ३० एप्रिलला ‘मन-की-बात’ चा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी आत्तापर्यंत विविध मुद्द्यांना या कार्यक्रमातून स्पर्श केला असल्याचं, उपराष्ट्रपतींनी सांगितलं. 

भारत जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असून आपला देश लवकरच तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल, असं धनखड यावेळी म्हणाले. सरकारनं आजपर्यंत जनहितासाठी राबवलेल्या  अनेक उपाययोजना अधोरेखित करत भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकार राबवत असलेल्या अनेक उपायांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वसामान्य जनतेच्या भावना समजून  घेत असून त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या यशोगाथा समाजासमोर आणल्या आहेत, असं युवा व्यवहार तसंच क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. या उद्घाटन सोहळ्यात संबोधित करताना ठाकूर बोलत होते. सामान्यांच्या मनातल्या भावना प्रधानमंत्री नेहमीच जाणून घेतात त्यामुळेच ते जगातल्या सर्वाधिक प्रमुख नेत्यांपैकी एक प्रमुख नेते झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं. आजपर्यंत शंभर कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी ‘मन-की-बात’ हा कार्यक्रम किमान एकदा तरी ऐकल्याची नोंद एका श्रोता सर्वेक्षणात झाली आहे, असंही ठाकूर यावेळी म्हणाले. भारत ही जगातली सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्था असून भारत आता जगातला दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश झाला आहे, असंही ठाकूर यावेळी म्हणाले. 

आकाशवाणीच्या इतिहासात ‘मन-की-बात’ हा कार्यक्रम सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला असून सुमारे २३ कोटी नागरिकांनी हा कार्यक्रम सातत्यानं ऐकला आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी यावेळी सांगितलं.  मन-की-बात हा कार्यक्रम म्हणजे नागरिकांशी होत असलेल्या  संवादाचं एक उत्तम उदाहरण असून या कार्यक्रमाचा देशातल्या जनतेवर व्यापक पातळीवर प्रभाव पडला आहे, असं मत या परिषदेत सहभागी झालेला  अभिनेता आमिर खान यांनं व्यक्त केलं आहे. 

या कार्यक्रमा दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. वेम्पती यांच्या ‘ पुस्तक- कलेक्टिव स्पिरिट, कंक्रीट एक्शन’ या पुस्तकाचं प्रकाशन केलं. तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रकाशित केलेल्या ‘माई डियर फेलो सिटिजन’ या पुस्तकाचं अनावरण केलं.  या कार्यक्रमात प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, अभिनेत्री रवीना टंडन, पॅराऑलिम्पिक ऍथलिट दीपा मलिक तसंच सूचना आणि प्रसारण मंत्रालय, आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अनेक अधिकारी उपस्थित होते.  

आज संध्याकाळी परिषदेचा समारोप होत असून या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संबोधित करत आहेत. 'मन की बात' या कार्यक्रमाचा शंभरावा भाग  येत्या तीस तारखेला प्रसारित होणार असून त्या दिवशी एका टपाल तिकीटाचं अनावरण तसंच एक विशेष नाणंही प्रदर्शित केलं जाणार आहे.