आगामी काळात राज्यातल्या २० हजार गावांचं सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासनाचा विचार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी काळात राज्यातल्या २० हजार गावांचं सर्वंकष परिवर्तन करण्याचा शासनाचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राजभवन इथं बोलत होते. 'नवभारत' वृत्तपत्र समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या 'कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत राजभवन इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातली अनेक गावं पाण्याच्या  बाबतीत स्वयंपूर्ण झाली असून, सीएसआर अंतर्गत कोणतेही उपक्रम मोठ्या प्रमाणात  राबवण्यासाठी शासन कॉर्पोरेट्स आणि उद्योग समूहांना निश्चितपणे मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. 

नवभारत वृत्तपत्र,  ९० व्या वर्षात पदार्पण करत  असल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते यावेळी नवभारत वृत्तपत्राच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं आणि एका कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वा इतकंच वैयक्तिक सामाजिक दायित्व देखील महत्वाचं असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. नोकरी, स्वयंरोजगार आणि उद्योगांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधली जावीत, आणि या कामात  कॉर्पोरेट क्षेत्र आणि  उद्योग संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्यपालांनी केलं.