नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.

या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या प्रवर्गातील असाव्यात. अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले पत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच मासिक उत्पन्न ३० हजारांपेक्षा जास्त नसावे. वसतिगृहात कमाल तीन वर्षापर्यंत राहण्याची मुभा देण्यात येते. तसेच पाच हजार इतकी रक्कम अनामत म्हणून व्यवस्थापकांकडे जमा करावी लागेल, अशी माहिती सहाय्यक आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा.