राज्यातल्या ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं गौरव

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी होणाऱ्या मतभेदांमुळं गावकऱ्यांचं विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित पंचायत राज पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. वैश्विक तापमानवाढ हे जगासमोरचं मोठं आव्हान असून, ही समस्या दूर करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आज हरित ऊर्जा तसंच शून्य कार्बन उत्सर्जनासाठी पंचायतींना पुरस्कार देताना, आपल्याला समाधान होत असल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं आजपासून २१ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा केला जात आहे. गरिबी निर्मूलन आणि जीवनमान सुधार संकल्पनेसाठी सांगली जिल्ह्यातल्या खंडोबाची वाडी ग्राम पंचायतीला, स्वच्छता आणि पर्यावरण स्नेही संकल्पनेसाठी सांगलीच्याच कुडाळ ग्राम पंचायतीला आणि महिला स्नेही उपक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलबाड ग्रामपंचायतीला पुरस्कार देण्यात आला. ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार पुणे जिल्ह्यातल्या टिकेकरवाडी ग्राम पंचायत आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रण गटात औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्राम पंचायतीने पुरस्कार पटकावला आहे.