स्वाधार योजनेचे ५ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

 

पुणे : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाने २४ तास काम करून १ हजार २३२ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले आहेत. त्यामुळे शासनाकडून प्राप्त झालेल्या ५ कोटी रुपयांचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. यासाठीची देयके कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत.

गेले २४ तासांमध्ये १ हजार २३२ व त्याआधी १३६ असे १ हजार ३६८ विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे स्वतः रात्री उशिरापर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे येथे उपस्थित होते. पुणे विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या नियंत्रणाखाली पुणे विभागातील सहाय्यक आयुक्त पुणे, सातारा ,सोलापूर व जिल्हा समाज कल्याण अधिकारी पुणे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे अर्ज तपासणीसाठी पथक तयार करण्यात आले होते. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ३ हजार अर्जांची तपासणी करण्यात आली आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे-विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कोणतेही अडचण होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध आहे. राज्यासाठी नुकताच रुपये १५ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी पुणे जिल्ह्यासाठी रुपये ५ कोटी देण्यात आले असून त्यातून १ हजार ३६८ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. उर्वरित निधीची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल