पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई मध्ये खारघर इथं झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळी ११ उपस्थितांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, राज्य शासना तर्फे मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल, तसंच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनातर्फे केला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. कामोठे इथल्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल रात्री रुग्णालयाला भेट दिली. खारघर इथल्या कालच्या  महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उपस्थित श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात हलवावं लागलं होतं. यापैकी ११ सदस्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. 

कालच्या कार्यक्रमा नंतर संपर्काबाहेर गेलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी "हरवले-सापडले" समितीचे प्रमुख आणि तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला 022-27542399 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.