राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात वार्ताहरांशी बोलत होते. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे फळबांगांसह काढणीला आलेल्या रब्बी पिकांचंही नुकसान झालं आहे. सहा महिन्यात पाचव्यांदा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह रिमझिम ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अमरावतीत जोरदार पाऊस झाला असून वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. सोलापूर जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस झाला. पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठा पाऊस झाला. यात अनेक फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यात कालपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. मात्र आज सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली.

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नेवासा तालुक्यात अनेक भागात गारपीट झाली. कांद्याचे सर्वाधिक नुकसान झालं असून गहू, फळबागांनाही फटका बसला आहे. वाशीम जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळ पासून ढगाळ वातावरण असून काल संध्याकाळी अनेक  तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे कारंजा तालुक्यात पेरु बागांचं अतोनात नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आजरा, राधानगरी, कागल, पन्हाळा तालुक्याला वळीवाच्या पावसानं झोडपलं.सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात काल संध्याकाळी आणि आज पहाटे अवकाळी पाऊस पडला. वैभववाडी, कणकवली, नांदगाव, कुडाळ आणि आंबोली याठिकाणी हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.