देशात ताण-तणावमुक्त संस्कृती निर्माण करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ताण तणाव मुक्त संस्कृती निर्माण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते आज जागतिक होमिओपथी दिनाच्या निमित्तानं नवी दिल्ली इथं आयोजित वैज्ञानिक संमेलनाचं उद्घाटन केल्या नंतर बोलत होते. एक पृथ्वी,एक कुटुंब, एक भविष्य हे भारताच्या जी-२० अध्यक्षीय परिषदेचा मुख्य हेतू आहे. आरोग्या शिवाय भविष्य नाही, असंही धनखड म्हणाले. आरोग्य सेवा म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार नसून त्यात व्यक्तीचं शारिरिक, मानसिक आणि भावनिक कल्याण, तसंच समाजिक आणि आर्थिक पर्यावरणाचा समावेश असतो, असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. होमिओपथी उपचाराला दोन दशकांचा समृद्ध वारसा आहे. आज जगात जलद गतीनं वाढणारी उपचार पद्धती म्हणून होमिओपथी नावारुपाला येत आहे.

आज होमिओपथी उपचार पद्धतीचा वापर ८० पेक्षा जास्त देशात केला जात असल्याचं धनखड यांनी सांगितलं. होमिओपथीचे संस्थापक डॉ ख्रिश्चन फ्रेडरिक सम्युअल हानेमन यांच्या जन्मदिनी, म्हणजेच आज, हा दिवस साजरा केला जातो. आय़ुष मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सीसीआरएच अर्थात  केंद्रीय होमिओपथी संशोधन परिषदेनं या अधिवेशनाचं आय़ोजन केलं आहे. होमिओपरिवार- सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य, एक कुटुंब ही या अधिवेशनाची संकल्पना आहे. अधिवेशनादरम्यान होमिओपथीमधील प्रगती, धोरणात्मक बदल,  संशोधन, पुरावे आणि होमिओपथीमधले शास्त्रीय ​​​​अनुभव यावर विविध सत्रं आयोजित केली जाणार आहे. या वैज्ञानिक अधिवेशनामुळे या क्षेत्राशी संबंधीत विविध भागधारकांच्या विचारमंथनाद्वारे संशोधन, शिक्षण आणि एकात्मिक प्रयत्नांच्या आधारे होमिओपथिचं भविष्यातलं धोरण आखलं जाणार आहे, याप्रसंगी एक माहितीपट, एक संकेतस्थळ आणि सीसीआरएचच्या ८ पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई आदी मान्यवर उपस्थित होते