हवामानशास्त्र विभागाकडील हवामान अंदाजविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. हवामानशास्त्र विभागाकडील माहितीचा आरोग्य विभागाला चांगला उपयोग करुन घेता येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

एल निनो समुद्र प्रवाह आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख के. एस. होसळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी, डॉ. राजीव चटोपाध्याय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उन्हाळ्यात होत असलेले हवामानबदल पाहता हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज, इशारे याकडे सर्वांचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेची लाट, पावसाचे अंदाज, वादळवारा आदींबाबतच्या अंदाजांची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी तसेच सर्वसामान्य व्यक्तीसाठी ही माहिती उपयुक्त असल्याने प्रत्येक गाव, ग्रामपंचायत तसेच गावातील व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.

हवामानशास्त्र विभागाकडील विविध अंदाज, अहवालांचा उपयोग आरोग्य विभागाला हवामानबदलामुळे होणारे साथीचे आजार आदींविरोधात उपाययोजना करण्यासाठी होऊ शकेल. त्याचबरोबर याबाबतची संबंधित विभागांनीही आपली माहिती हवामानशास्त्र विभागाला उपलब्ध करुन दिल्यास संयुक्तपणे चांगले काम होऊ शकेल. पुणे हवामानशास्त्र विभागाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख यावेळी म्हणाले.

यावेळी श्री. होसाळीकर यांनी सांगितले, हवामानशास्त्र विभागाकडून विविध अत्याधुनिक प्रारुपांचा उपयोग हवामान तसेच पावसाचा अंदाजासाठी केला जातो. आगामी नैऋत्य मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला असून त्यानुसार सरासरीच्या ९६ टक्के म्हणजेच सामान्य पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसावर प्रभाव टाकणाऱ्या अल निनो प्रवाहाची स्थिती यावर्षी पावसाळ्यात विकसित होण्याची असली तरी सध्यातरी त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.

फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये युरेशियावर सामान्यापेक्षा कमी बर्फाचे आवरण दिसल्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल घटक आहे. तसेच तटस्थ हिंद महासागर द्विध्रुव (आयओडी) परिस्थिती विकसित होण्याची शक्यता असून हा घटकही नैऋत्य मोसमी पावसासाठी अनुकूल आहे. मे अखेरीस दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पुण्यासाठी लवकरच स्वतंत्र डॉप्लर रडार
स्थानिक हवामान अंदाज अधिक अचूक आणि वेगवानरित्या वर्तविण्याच्यादृष्टीने पुणे शहरासाठी स्वतंत्र डॉप्लर रडार मंजूर केले आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या रडारमुळे ‘नाऊकास्ट’ नुसार आगामी दोन तीन तासातील अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे. पुणे शहरात सध्या पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा या सहा ठिकाणी रिअल टाइम तापमान व हवामान स्थितीविषयक माहिती जमा करण्याची व्यवस्था असून ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही श्री. होसळीकर यावेळी म्हणाले.

यावेळी अनुपम कश्यपी यांनी विभागाकडील हवामान अंदाज, इशारे, त्याचे प्रकार, चिन्हांचे अर्थ आदींबाबत माहिती दिली. पुणे शहर व परिसरासाठी विभागाकडून स्थानिक अंदाज व हवामान सल्ला जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने पुणे शहरात १६० ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर हवामानाची माहिती दर्शविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. चटोपाध्याय यांनी उष्णतेची लाट आणि हवामान प्रारुपांचा आरोग्य क्षेत्रासाठी उपयोग याबाबत माहिती दिली. मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीचा पूर्वानुमानासाठी या प्रारुपांचा उपयोग होऊ शकतो. आरोग्य विभाग आणि हवामानशास्त्र विभागाने समन्वयाने काम केल्यास याविषयी गतीने उपाययोजना करता येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी हवामानशास्त्र विभागाचे मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/mumbai/, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे https://mausam.imd.gov.in/ तसेच पुणे https://www.imdpune.gov.in/marathi/indexmarathi.php या संकेतस्थळ तसेच विभागाचे ‘मौसम’ ॲप, वीजांबाबत माहिती देणारे ‘दामिनी’ ॲप आदी मोबाईल ॲपचा उपयोग करण्याबाबत माहिती देण्यात आली.