राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पंचामृतावर आधारित राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुतंवणुकीत पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, सक्षम कुशल युवा आणि पर्यावरण पूरक विकास या पंचामृतांचा समावेश करण्यात आला आहे. फडनवीस यांनी पारंपरिक पद्धतीनं छापील भाषण वाचून न दाखवता आयपॅडच्या माध्यमातून डिजिटल अर्थसंकल्प सादर केला. विधानपरिषदेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज हा अर्थसंकल्प सादर केला. 

नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. याअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून ६ हजार रुपये दिले जातात. त्यात राज्य सरकार अजून ६ हजार रुपयांची भर घालणार असून यामुळं शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये आर्थिक मदत मिळेल. याचा लाभ राज्यातल्या १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे, असं फडनवीस म्हणाले.  यासाठी ६,९०० कोटी रुपये राखून ठेवण्य़ात आले आहेत. शेतकऱ्यांचा पीक विम्याचा हप्ता भरण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून शेतकऱ्यांचा केवळ १ रुपये भरुन प्रधानमंत्री पीक वीमा योजनेत सहभागी होता येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. ३ हजार कोटी रुपयांच्या महाराष्ट्र कृषी विकास अभियानाची घोषणाही त्यांनी केली. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेची घोषणा त्यांनी केली. याशिवाय महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि मेंढी व शेळी विकास महामंडळांची स्थापना करण्याचेही त्यांनी जाहीर केले. ५ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार २ राबवण्याची घोषणा फडनवीस यांनी केली. 

महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या भाड्यात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा त्यांनी केली. 

आशा स्वयंसेविकांचे आणि गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना ५ हजार रुपये, तर गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये मानधन मिळेल. अंगनवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ७ हजार २०० रुपये करण्याची घोषणा त्यांनी केली. अंगणवाडी  मदतनिसांचे मानधन ५ हजार ५०० रुपये करण्याची घोषणा त्यांनी केली. काम करणाऱ्या महिलांसाठी ५० वसतीगृह राज्य सरकार सुरू करणार असल्याचं ते म्हणाले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत ४ कोटी महिलांची तपासणी करण्याची घोषणा त्यांनी केली. 

महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरुन ५ लाख रुपये करण्याची घोषणा फडनवीस यांनी केली. यात अतिरिक्त २०० रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. पूर्ण राज्यभरात ७०० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. यात चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणारी मदत १ हजार रुपयांहून दीड हजार रुपये करण्याचे आज अर्थसंकल्पात त्यांनी जाहीर केले. 

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत राज्याच्या या वर्षी ४ लाख घरे बांधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यातली अडीच लाख घरे अनुसुचित जातीसाठी आणि दीड लाख इतर प्रवर्गांसाठी असतील. इतर मागासवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजनेची घोषणा त्यांनी केली. यात ३ वर्षात १० लाख घरे बांधली जाणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचे फडनवीस यांनी जाहीर केले. याशिवाय जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महामंडळ अशी विविध महामंडळे स्थापन करण्याचे त्यांनी आज जाहीर केले. 

२ ते ९ जून २०२३ दरम्यान शिवराज्यभिषेक महोत्सव सरकार आयोजित करणार आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे. मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या दृकश्राव्य सुविधा असलेल्या उद्यानासाठी २५० कोटी त्यांनी जाहीर केले. आंबेगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पना उद्यान उभारण्यासाठी ५० कोटी रुपये त्यांनी राखून ठेवले आहेत. किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जीवनावर संग्रहालयासाठी त्यांनी ५० कोेटी रुपये जाहीर केले.