दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का लावण्याचा राज्य सरकारचा विचार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का कायदा लागू करण्यासाठी विचार करण्यात येईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आमदार हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित केली होती. यासाठी अन्न औषध प्रशासन विभागासोबत बैठक घेऊन एक हेल्पलाईन सुरु करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले.

नोव्हेंबर २००१नंतर स्थापन झालेल्या ७८ नव्या  महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत येत्या मे महिन्यापर्यंत निर्णय घेतला जाईल. अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश टोपे यांनी उपस्थित केली होती, या संदर्भात अजित पवार, हरिभाऊ बागडे आदींनी उप प्रश्न विचारले, याचा वित्तीय भार वार्षिक ७९ कोटी इतका असून  त्यांना नॅक ची मान्यता घेण्याच्या अटीवर अनुदान देण्यात येईल असेही ते म्हणाले.

डहाणू परिसर हा संवेदनशील भाग म्हणून केंद्राने जाहीर केलेला आहे, त्यामुळे तिथल्या विकास कामांसाठी संबधित प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. डहाणू नगर परिषदेच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्याबाबतची लक्ष वेधी मनिषा चौधरी यांनी उपस्थित केली होती, त्यावर या प्रकरणी पुनर्विचार याचिका शासनाने दाखल करावी अशी सूचना पिठासीन अधिकारी योगेश सागर यांनी केली.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूरच्या कुलगुरूंनी कोरोना काळात केलेल्या कामांची चौकशी ३० एप्रिल पूर्वी उच्च तंत्रशिक्षण संचालकांकडून केली जाईल अशी घोषणा या खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याबाबतची लक्षवेधी राम सातपुते यांनी उपस्थित केली होती.