जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचं  कामकाज १० मिनिटांसाठी दोनदा तहकूब करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं  तातडीनं  चर्चा घ्यावी अशी मागणी करत शिक्षक सदस्य कपिल पाटील, विक्रम काळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.

सरकार यासंदर्भात वेळकाढूपणा करत आहे , सुरू झाला तरी सरकार प्रतिसाद देत नाही असा आरोप विक्रम काळे यांनी केला. मात्र उपसभापती नीलम गोर्हे यांनी हे स्थगन प्रस्ताव फेटाळून लावले, त्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली. जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या मागणी संदर्भात सरकारनं सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.  याबद्दल सरकार काहीना काही मार्ग काढेल सरकारला यासाठी वेळ द्यावा, असं संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन द्यावं असे निर्देश उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिले.