महाराष्ट्रात कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३०० रुपये मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी आणि देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल भावाची शिफारस केली होती. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. शेतकरी अडचणीत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी संवेदनाहीन अशी टिपणी केली. ही बाब अतिशय दुर्दैवी असून या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत दिली जात नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. सरकारच्या  निषेधात भुजबळ यांच्यासह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.