शेतकऱ्यांची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा मुद्दा प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात सहा हजार आठशे कोटी रुपये नियमित नुकसानापैकी सहा हजार कोटी रुपये तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी ७५५ कोटी रुपये वाटप झाल्याचं सांगितलं.

तीन हजार ३०० कोटी रुपये अतिरिक्त नुकसा भरपाईची मागणी आली असून, त्याची वैधता तपासली जात असल्याचं ते म्हणाले. कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान वाटप केलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, अजून फार मोठा वर्ग या अनुदानापासून वंचित असल्याचं सांगितलं. हे अनुदान देण्यासाठी कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी पवार यांनी केली.