लोकसभेत वित्त विधेयक २०२३ मंजूर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज आवाजी मतदानानं वित्त विधेयक २०२३ मंजूर करण्यात आलं. याबरोबरच लोकसभेतली अर्थसंकल्पाविषयीची प्रक्रीया आज पूर्ण झाली. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळं या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी केंद्रीय वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सरकार स्थापन करणार असल्याचं आश्वासन यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं. ही समिती आर्थिक ताळमेळ साधतानाच कर्मचाऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देईल. समितीच्या शिफारशी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही स्वीकारता येतील, असं त्या म्हणाल्या. वित्त विधेयक मंजूर होत असताना विरोधकांची घोषणाबाजी सुरूच असल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा सलग ९व्या दिवशी राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समुहाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं सुरुवातीला लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत आणि राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला अडीच वाजेपर्यंत आणि नंतर साडे ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.