विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात काल झालेल्या अवमानकारक आंदोलनाचा मुद्दा आज पुन्हा विधानसभेत चर्चेला आला आणि यामुळं ३ वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. वारंवार घडणाऱ्या या घटना रोखण्यासाठी एक आचारसंहिता लागू केली जाईल. तिचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलन करणाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज सकाळी विधानसभेत नियमित कामकाज सुरू केलं तेव्हा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणा करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी भाजपाकडून आशिष शेलार यांनी केली. यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी केली. याप्रकरणी संपूर्ण व्हिडीओ फुटेज तपासून पाहून उद्या निर्णय देऊ असं आश्वासन अध्यक्षांनी दिलं.

विरोधी पक्षाकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द उच्चारले गेल्याचा आरोप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यामुळं सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. यामुळे झालेल्या गोंधळात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज तहकूब केलं. कामकाज सुरू झाल्यावर घोषणाबाजी सुरू राहिल्यानं पुन्हा २ वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि सर्व गटनेत्यांसोबत अध्यक्षांनी बैठक घेतली आणि याबाबत उद्या निर्णय देईल, असं आश्वासन दिलं. यानंतर गोंधळ शांत झाला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं. राहुल गांधी यांनी देशातल्या लोकशाहीच्या विरोधात परदेशात केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं ते म्हणाले. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या विरोधातलं बोलणंही सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे, असंही मुख्यमंत्री काँग्रेसच्या आमदारांना उद्देशून म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात महाविकास आघाडीनं केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. वारंवार अवमानकारक शब्दांचा वापर करुन आम्हाला हिणवण्यात आलं, असं ते म्हणाले. यामुळं अवमानकारकरित्या आंदोलन, घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही बाजूच्या सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनीही त्याला दुजोरा दिला. त्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झालं.