जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, जेईई, नीटद्वारे २०२३-२४ या पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तात्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी), संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागेवर प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही अशा जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करुन त्याची एक प्रत आवश्यक कागदपत्रे, पुराव्यांची साक्षांकित प्रत जोडून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कारागृह रोड, आयटी पार्कच्या मागे, येरवडा, पुणे-६ येथे सादर करावी.

याअगोदर जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केलेल्या व प्रकरणात त्रुटी असलेल्या अर्जदारांना भ्रमणध्वनी, इमेलद्वारे संदेश देण्यात आले असून संदेशाप्रमाणे तात्काळ त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.