पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची सरमिसळ

 

पुणे : जिल्ह्यातील २१५-कसबा विधानसभा मतदारसंघ आणि २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस.सत्यनारायण आणि २१५-कसबा विधानसभा मतदारसंघाचे पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी सुभाष भागडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

एकूण १ हजार ५८६ बॅलेट युनिट, १ हजार ५३९ कंट्रोल युनिट आणि १ हजार ५४२ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. यापैकी ३३८ बॅलेट युनिट, ३३८ कंट्रोल युनिट आणि ३५१ व्हीव्हीपॅट कसबा पेठ मतदारसंघासाठी आणि ६३८ बॅलेट युनिट, ६३८ कंट्रोल युनिट आणि ६६३ व्हीव्हीपॅट यंत्र चिंचवड मतदारसंघासाठी वितरित करण्यात येतील.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.