देशवासियांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातल्या नागरिकांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना ते आज बोलत होते.

आम्ही सत्तेत येण्यापूर्वी देशातल्या केवळ ३ कोटी नागरिकांना नळानं पाणी मिळत होते. आता ही संख्या ११ कोटींपर्यंत वाढल्याचं ते म्हणाले. बँकांचं राष्ट्रीयीकरण झाल्यानंतरही अर्ध्याहून अधिक नागरिक बँकेपर्यंत पोहोचले नव्हते. पण आम्ही जनधन योजनेच्या माध्यमातून बँकांना ग्राहकांपर्यंत नेलं.

गेल्या ९ वर्षात ४८ कोटी जनधन खाती उघडली असून त्यातली ३२ कोटी खाती ग्रामीण भागात असल्याकडे प्रधानमंत्र्यांनी लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आमच्यावर चिखल उडवण्याचा जितका प्रयत्न केला जाईल, तितकं कमळ अधिक फुलेल असं ते म्हणाले.

काँग्रेस पक्षानं ६ दशकं वाया घालवली असा आरोप त्यांनी केला. देशातली जनता समस्यांना सामोरी जात असताना त्यांचे प्राधान्यक्रम वेगळेच होते. मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर नागरिकांच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दिशेने काम सुरू केल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.