एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान मुलांना भूगोल, भाषा आदी विषयांची उत्कृष्ठ पुस्तकं उपलब्ध व्हावीत यासाठी राष्ट्रीय डिजिटल वाचनालय सुरू केलं जाणार आहे. याशिवाय पंचायत स्तरावर वाचनालय सुरू करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिलं जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली.

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आणि जिल्हा पातळीवरच्या शिक्षक प्रशिक्षण संस्थांच्या सक्षमीकरणासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.युवकांना रोजगार आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं म्हणून राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात येत असून युवकांना परदेशी नोकरीची संधी मिळवून देणारी मदत केंद्र उभारण्याची योजना सरकारनं आखली आहे. नागरी सेवांमधे युवकांना आपली क्षमता दाखवता यावी याकरता मिशन कर्मयोगी  सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे राबवण्यात येणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणासाठी आय गॉट कर्मयोगी हा वेगळा मंच तयार करण्यात येणार आहे.

सध्या सुरू असलेल्या १५७ नर्सिंग महाविद्यालयांच्या जोडीला आणखी १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालयं देशभरात सुरू केली जाणार आहेत.  २०४७ पर्यंत सिकलसेल आजाराचा समूळ नाश करण्यासाठी विशेष जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ४० वर्षांपर्यंतच्या लोकांची विशेष तपासणी केली जाईल.