महाराष्ट्रासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातली तरतूद संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या तरतुदीच्या ११ पट -अनुराग ठाकूर

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 13 हजार सातशे कोटी रुपये तरतूद असून ही रक्कम संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातल्या तरतुदीच्या जवळजवळ 11 पट असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज मुंबईत सांगितलं. दोन वंदे भारत रेल्वे गाड्या मिळालेलं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे असं सांगून ते म्हणाले की, मोदी सरकारने नेहमीच नागरी आणि  ग्रामीण भागात वाहतुकीला महत्त्व दिलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत ठाकूर आज मुंबई दौऱ्यावर आले होते. दक्षिण- मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांना त्यांनी भेट दिली, आणि पक्षाच्या गाभा समितीची बैठक घेतली. त्याखेरीज त्यांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघालाही भेट दिली. भाजपा सरकारच्या काळात युवकांना कौशल्यविकास, कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासठी अनेक उपाययोजना केल्या जात असून क्रीडाक्षेत्रासाठी तीन हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. सरकारी योजनांचा फायदा थेट शेवटच्या लाभार्थ्याला मिळावा याची काळजी आपलं सरकार घेतं असं सांगून ते म्हणाले की भाजपाने नेहमीच युती करणाऱ्या मित्रपक्षांचा मान राखला आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत दसपट जास्त आर्थिक तरतूद केली असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. नऊ कोटी घरांमधे नळाने पाणीपुरवठा तर साडेनऊ कोटी लाभार्थ्यांना एलपीजी गॅसजोडण्या दिल्या गेल्या. असं ते म्हणाले. महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की उद्धव ठाकरेंना पराभूत करायला भाजपाचा सामान्य कार्यकर्ताही पुरेसा आहे, त्यासाठी आपल्याला निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची गरज नाही.